Sunday, August 30, 2015

गद्यकाव्याचा आद्य प्रणेता



काव्यनिर्मितीसाठी 'प्रतिभा आणि व्युत्पत्ती' या दोन गुणवत्ता असून, कवीचे मूल्यांकन या गुणांवर आधारलेले आहे. प्रतिभा म्हणजे कवीची विशिष्ट मानसिक शक्ती होय. दंडीने प्रतिभेचे 'सहज' आणि 'उत्पाद्' असे दोन प्रकार सांगितले आहेत. राजशेखरने प्रतिभेचा आणखी एक प्रकार वर्णिला आहे. त्याचे नाव आहे 'औपदेशिक.' सहज, आहार्य आणि औपदेशिक अशा तीन प्रकारच्या प्रतिभेच्या सहाय्याने रचना करणाऱ्या कवींना राजशेखरने अनुक्रमे सारस्वत, आभ्यासिक व औपदेशिक अशी नावे दिली आहेत. आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने संस्कृत साहित्यात गद्य आणि पद्य रचना करणाऱ्या सर्वांनाच बहुधा महाकवी म्हणूनच संबोधले गेले आहे. पूर्ण काव्यमय रचना करणारे महाकवी जसे संस्कृत साहित्यात उदयास आले; तसे गद्यकाव्य लिहिणारे कवीही खूप लोकप्रिय झाले. संस्कृत साहित्यातील गद्यकाव्याचा आद्य प्रणेता म्हणून बाणभट्टाचे नाव जसे सर्वांत प्रथम डोळ्यासमोर येते; तसेच बाणभट्टाने लिहिलेल्या कादंबरी ह्या महान साहित्यकृतीचे सहजतेने स्मरण होते.

संस्कृत साहित्यातील रसिकत्वाने प्रथमपासूनच गद्यापेक्षा पद्यच विचारव्यक्तीसाठी अधिक पसंत केले. टीका, कोश, व्याकरण, दर्शने यासारख्या चिंतनात्मक आणि अभ्यासाच्या विषयासाठी सुद्धा संस्कृत साहित्यिकांनी 'पद्य-रचना' हेच साधन वापरले. लौकिक संवाद-रचनांसाठीही पद्याचाच उपयोग केला. ऋग्वेद हा प्राचीनतम ग्रंथ काव्यात्म सूत्रांत गुंफला आहे. तथापि यजुर्वेदाचा अर्धा भाग आणि अथर्ववेदाचा सहावा भाग गद्यमय आहे. म्हणजे संस्कृत, गद्य रचनांचा प्रारंभ वैदिक मंत्रकाळातच होतो. त्यानंतर सूत्रकाळात अल्पाक्षर-गद्य हा प्रकार रुढ झाला.

पदलालित्य, अलंकारयोजना, शब्दसंगती आणि दीर्घ समासरचना ही गद्य रचनेची वैशिष्ट्ये ठरतात. त्या वैशिष्ट्यांबरोबर गद्य रचनांना ऐटबाज काव्यशैली लाभली आणि गद्यकाव्य हा प्रकार तितकाच लोकप्रिय ठरला, तर

गद्य कवींना निकषं वदन्ति

ही उक्ती प्रचारात आली. दंडी, बाण आणि सबन्धु यांचे नांव गद्यकाव्याच्या इतिहासात प्राधान्याने घेतले जाते. संस्कृतमधील गद्यकाव्य हे प्रायः 'कथा आणि अख्यायिका' या दोन स्वरूपात आढळते. पीटर्सनने संस्कृत व ग्रीक गद्यकाव्यांची तुलना करून त्यातील काही साम्यस्थळे कमी केली आणि संस्कृत गद्यकाव्याचा मूळ प्रवाह ग्रीस देशातून आला, असे मत मांडले; परंतु सिल्वां लेवी, लॅकोट इ. फ्रेंच पंडितांनी त्यांचे मत पूर्णतः खोडून काढले. संस्कृत साहित्यातील गद्यरचनेची शैली, आशय आणि अंतरंग वेगळे आहे आणि ते तत्कालीन कवींचे प्रज्ञादर्शक आहे.

'कादंबरी' हा बाणभट्टांचा सुप्रसिद्ध ग्रंथ होय; तसेच चंडीशतक नावाचे शतककाव्यही बाणभट्टाने लिहिले आहे. या काव्यात स्त्रग्धरा वृत्तात चंडीदेवीचे अनेक प्रकारे स्तवन केले आहे. दिव्य लोक भूतलावर आणून उभा करणारी कादंबरी ही महाकवी बाणभट्टांची अमर साहित्यकृती आहे. शृंगार, अद्भुत व करुण या तीन रसांचा तो त्रिवेणी संगम आहे. स्वर , वर्ण, पद, रस व भाव याचा मधुर अविष्कार कादंबरीत पहायला मिळतो. बाणभट्टांची कादंबरी ही गद्यकाव्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. धर्मदास नावाच्या कवीने आपल्या 'विदग्धमुखमंडन' या ग्रंथात बाणाच्या वाणीविषयी एक सुंदर रूपक उभे केले आहे. एक कवी म्हणतो काय सांगू, 'तिच्या स्वराचे, वर्णाचे आणि पदाचे सौंदर्य काय वर्णावे? ती कशी आहे?'

रुचिस्वरवर्णपदा रसभाववती जगन्मनो हरति।

रस आणि भाव तिच्या अंगी खेळत असल्यामुळे ती सर्वांची मने हरण करते. हे ऐकून दुसरा कवी विचारतो की, अशी ही तरुणी कोण आहे? त्यावर तो कवी म्हणतो..

तत्किं तरुणी न हि नहिवाणी बाणस्य मधुरशीलस्य।

छे, छे, मी त्या तरुणीविषयी बोलत नाही, तर मी मधुरस्वभावी बाणाच्या वाणीविषयी बोलतो; बाणाची वाणी ही जणू सद्गुण सौंदर्यवती तरुणी आहे आणि सारस्वताच्या विश्वात मनमोकळ्या रसिकत्वाने मुक्तपणे विहार करीत आहे. ज्ञानदेवांनीही गीतेला कोणाच्या रूपात उभे करत आहे हे सांगताना एक सुंदर ओवी लिहिली आहे.

देशियेचिये लावण्य।

हिरोनि आणिले तारुण्य।

मग रचिले अगण्य।

गीतातत्त्व।।

तत्त्वबोधाचे विवेचन म्हटल्यावर ते प्रौढ आणि गंभीर स्वरूपाचे असणार? पण मी देशभाषेचे म्हणजे मराठीचे लावण्य आणि तारुण्य आणून गीतातत्त्वाचेच सौंदर्यरूप उभे केले आहे.

ज्या संस्कृत कवींनी आपापल्या काव्यात स्वचरित्रे दिली आहेत, अशांमध्ये बाणभट्टाला अग्रस्थान द्यायला हवे. बाणभट्टाचा कालखंड निश्चितपणे ठरविण्यासाठी त्याचे ग्रंथच उपयुक्त ठरतात. त्याने आपले चरित्र 'कादंबरी'मध्ये थोडक्यात, तर 'हर्षचरित' या ग्रंथात विस्तृतपणे दिले आहे. त्याच्या वडिलांचे नाव चित्रभानू आणि आईचे नाव 'राज्यदेवी' असे होते. शोण नदीच्या तिरावरील 'प्रीतिकूट' हे बाणभट्टाचे गांव होय. बाणाच्या लहानपणीच त्याची आई वारली आणि वयाच्या १४ व्या वर्षी वडीलही वारले. आई-वडिलांच्या निधनानंतर काही वर्षे त्याने तीर्थाटन केले. त्या काळात कुसंगतीमुळे तो स्वच्छंदी बनला; पण पुनश्च घरी आल्यावर त्याचे वर्तन सुधारले. त्याने वेद-उपनिषदे, शास्त्रे याचा मनापासून अभ्यास करीत व्यासंग वाढविला. त्याच्या गुरूंचे नाव 'भूर्च' असे होते. बाणभट्ट हा सम्राट हर्षवर्धनाचा सभाकवी होता. सम्राट हर्षवर्धनाची माहिती जशी बाणभट्टाने दिली आहे, तशीच ती 'ह्युएन्त्संग' नामक व्यासंगी अशा चिनी यात्रेकरूने दिली आहे. त्या दोहोंतील माहिती सदृश आहे. इ. स. ६०० ते ६५० असा असावा. अध्ययन समाप्तीनंतर बाणभट्टाला एकदा हर्षवर्धनाकडून आमंत्रण आले; पण बाणभट्टाच्या काही खलनिंदकांनी 'अहो महानयं भुजंगः' हा मोठा भुजंग म्हणजे स्त्रीलंपट आहे, असे सांगून हर्षवर्धनाचे कान भरविले होते; पण बाणभट्टाचा यथायोग्य परिचय झाल्यावर हर्षवर्धनाला बाणभट्टाचे मोठेपण उमगले आणि त्याची प्रतिभा, विद्वत्ता आणि बुद्धीमत्ता पाहून त्याला राजाश्रय दिला. मयुरभट्ट नावाच्या एका पंडिताच्या भगिनीशी बाणाचा विवाह झाला. हा मयूरभट्ट म्हणजे स्वतःचा कुष्ठरोग जावा म्हणून सूर्यशतक लिहिणारा कवी मयूर होय. राजाश्रयाने आनंदित झालेल्या बाणभट्टाला काव्यप्रतिभेसाठी खरी मुक्तता लाभली आणि त्याच वेळी 'हर्षचरित' हा गद्यग्रंथ लिहून त्याने राजकृपेची अंशतः फेड केली. हर्षचरित हे समकालीन कवीने लिहिलेले एका बलाढ्य राजाचे चरित्र आहे. तो ग्रंथ 'आख्यायिका' या प्रकारात मोडतो. हर्षचरित व कादंबरी, चंडीशतक आणि पार्वतीपरिणय (नाटक) एवढी ग्रंथसंपदा त्याच्या नावावर असली, तरी बाणभट्टाच्या प्रतिभेची उत्तुंगता आणि लोकप्रियता उभी राहाते ती 'कादंबरी'मुळेच.

No comments:

Post a Comment