Sunday, August 30, 2015

संस्कृतमध्ये घडले करिअर

टीव्हीवरील पौराणिक मालिकांना संदर्भ देणे, व्हॅल्यू अॅडिशन करणे, मालिकांमधील पात्र किंवा प्रसंगानुरूप नवीन संस्कृत श्लोकांची रचना करणे अशी अनेक आव्हाने पेलत कोलशेत येथील मृणाल नेवाळकर हिने संस्कृतमधील करिअरला झळाळी दिली आहे. देवभाषेत काय करिअर करणार, असा प्रश्न पडणाऱ्यांना ते 'आयटी'च्या बरोबरीने उत्पन्नाचे साधन बनू शकते, असे उत्तर मृणालने दिले आहे.

मुंबई विद्यापीठात २०१०मध्ये 'एमए' परीक्षेतील टॉपर असलेली मृणाल सध्या पौराणिक मालिकांसाठी संशोधक, मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. संस्कृत दिनानिमित्त तिने 'मटा'शी संवाद साधला. संस्कृतचा अभ्यास ही सोपी गोष्ट नाही. मात्र, हा अभ्यास करणारे लोक म्हणजे करिअरची अन्य संधीच मिळाली नाही म्हणून किंवा केवळ विषय म्हणून संस्कृत शिकणारे नाहीत. संस्कृतच्या अभ्यासकांना विविध क्षेत्रांत मागणी आहे आणि त्यांना निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे, असे मृणाल आवर्जून सांगते. ती सध्या सोनी टीव्हीवरील सूर्यपूत्र कर्ण या मालिकेसाठी काम करत आहे.

मृणाल मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहे आणि 'एमए'साठी व्हिजिटींग लेक्चरर म्हणूनही काम करत आहे. लेखक अमित त्रिपाठी यांच्याबरोबरही ती गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. संस्कृतचा अभ्यास केल्यावर या भाषेचे क्लासेस घेण्यापलिकडेही खूप मोठे करिअर होऊ शकते, असे ती सांगते. हे करिअर अतिशय थ्रिलिंग आहे. प्रोडक्शनकडून रोज कोणत्या नव्या संदर्भांची, अभ्यासाची मागणी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मूळ स्क्रिप्टमध्ये व्हॅल्यू अॅडिशन करण्याचे आणि ते अधिक अर्थपूर्ण करण्याचे काम करावे लागते.

काट्यावरची डेडलाइन

मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणे खूप कष्टाचे आणि विशेष अभ्यासपूर्ण आहे. मालिकेसाठी कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मांडणे, त्याचा बारकाईने अभ्यास करणे, ग्रंथांमधून संदर्भ शोधणे, तत्कालिन लाइफस्टाइल आणि अनुरूप श्लोकरचना करण्याचे काम असते. ऐतिहासिक, तार्किक विचार करून या गोष्टी पडताळून बघाव्या लागतात. डेडलाइन नेहमीच घड्याळाच्या काट्यावर असते.

'स्क्रिप्ट तयार आहे आणि तासाभरात शूट सुरू करतोय. नवीन श्लोक तयार करून द्या,' असा मृणालला फोन येतो आणि तिची कसरत सुरू होते. काम कमी वेळाचे, खूप कष्टाचे, अभ्यासपूर्ण आणि अधिक जबाबदारीचे असल्याचे ती सांगते. आम्ही दिलेले संदर्भ चुकले आणि ते तसेच दाखविले गेले तर, कथानकावरून लोकांचा विश्वास उडेल. नवीन पिढी याच मालिका पाहून घडत असते. त्यामुळे अशा कामावर खूप लक्ष केंद्रीत करावे लागते.

संस्कृत अभ्यासाची रिस्क

आर्ट‍्सला प्रवेश घेतल्यानंतर मुळातच मला सगळ्यांनी वेड्यात काढलं. त्यातही नंतर स्पेशलायझेशनला संस्कृत निवडल्यानंतर परिचितांनी खूप चेष्टा, हेटाळणी केली. अक्षरशः भिकेचे डोहाळे लागल्याचे उपरोधिक बोलणेही मला ऐकावे लागले. पण आता माझ्या बरोबरीच्या तथाकथित उत्तम शिक्षण झालेल्यांच्या तुलनेत मी कमी वेळात अधिक पैसे कमावते आणि खूप मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळते. आता तेच परिचित मला म्हणतात, 'तू संस्कृतच्या अभ्यासाची रिस्क घेतलीस ते छान झालं.'

No comments:

Post a Comment