Sunday, August 30, 2015

विद्यापीठाचा सक्रिय विभाग

भारतातील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठातील एक महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम राबविणारा विभाग म्हणजे संस्कृत भाषा विभाग. संस्कृत दिनाच्या निमित्ताने या विभागाच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...

मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाची स्थापना २९ एप्रिल १९६१ रोजी झाली आणि २ जानेवारी १९६३ रोजी विभागाचा कार्यारंभ झाला. प्रा. डॉ. हरी दामोदर वेलणकर यांनी प्रथम विभागप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला तर, रा. गो. भांडारकर हे विभागाचे पहिले प्राध्यापक होते. सध्या या विभागाचा कार्यभार विभागप्रमुख डॉ. गौरी माहुलकर यांच्याकडे आहे.

विभागातर्फे संस्कृत भाषेचे अनेकविध अभ्यासक्रम चालवले जातात. यातील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

* एम. ए. संस्कृत

बी. ए. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्याक्रमासाठी पात्र ठरतात. याशिवाय विभागात चालविले जाणारे संस्कृत प्रमाणपत्र, संस्कृत पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थीदेखील एम. ए.पदवीचा विचार करू शकतात. नोकरी करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर शनिवार- रविवारी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी करूनही संस्कृत भाषेची आवड जोपासता येते. या पदवीकरिता अलंकार, वेद, वेदांत आणि व्याकरण या चार विषयांपैकीच एका विषयाची निवड करावी लागते.

* एम. फिल आणि पीएचडी

हे अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागातर्फे मार्गदर्शक (गाइड) उपलब्ध करून दिले जातात. यासाठी उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड होते.

* संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संस्कृत पदविका, संस्कृत प्रगत पदविका

शाळेत केवळ गुणांसाठी संस्कृत शिकून पुढे वेगळ्याच क्षेत्रात करिअर केले जाते. पण नोकरीत स्थिर झाल्यानंतर भाषेची आवड जोपासण्यासाठी अनेकजण संस्कृत शिकवणीकडे वळतात. या अभ्याक्रमासाठी संस्कृतच्या पूर्वज्ञानाची अट नसल्याने कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरते. तसेच या अभ्यासक्रमामुळे करिअरच्या अनेक नव्या संधी गवसतात.

* तौलनिक पुराकथाशास्त्र पदविका

(पदव्युत्तर डिप्लोमा मायथॉलॉजी), तौलनिक पुराकथाशास्त्र प्रगत पदविका (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मायथॉलॉजी)- लहानपणापासून आपण कथा ऐकतो. या कथांचा पुराकथांशी असणारा संबंध, या कथांचे महत्त्व, त्यांचा होणारा वापर यांचा अभ्यास केला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्याही अनेक संधी उपलब्ध होतात. या दोन अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विद्यार्थीक्षमता वाढवली आहे.

* भक्तीसाहित्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

यांमध्ये भक्तीसाहित्य, संत साहित्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

* हस्तलिखितशास्त्र

प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत अभ्यासक्रम या विभागात मोडी, ब्राह्मी, शारदा, तेलगु, ग्रंथ, नेवारी अशा लिपींची ओळख करून दिली जाते. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हस्तलिखितशास्त्रासंदर्भात संशोधनात्मक कार्यही करू शकतो.

वरील सर्व अभ्यासक्रमांसह संस्कृत भाषा संवर्धनासाठी विभागातर्फे वेळोवेळी तज्ज्ञांची व्याख्याने, राज्यस्तरीय चर्चासत्रे, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते, असे सहाय्यक प्राध्यापिका हर्षदा सावरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment